नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा स्ट्रेन पुन्हा बदलत असल्यामुळे कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी सध्या वापरात असलेली औषधे निष्क्रीय ठरतील का अशी भीती सगळ्यांनाच वाटत आहे. याचदरम्यान कोरोनावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा योगगुरू बाबा रामदेव यांनी केला होता. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी त्यांनी आणखी एक औषध लाँच केले होते. रामदेव बाबांनी ही घोषणा दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात केली होती. त्यांच्यासोबत यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरीदेखील उपस्थित होते. यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने आश्चर्य व्यक्त केले होते.
सोमवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे कोरोनिल हे औषध लाँच केल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. सोमवारी एक प्रेस रिलिज जारी करत आयएमएने डॉ. हर्षवर्धन यांना अनेक प्रश्नही विचारले आहेत. आयएमएने जारी केलेल्या निवेदनात केंद्रीय आरोग्यमंत्र्यावरही भारतीय वैद्यकीय परिषदेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
IMA HQs Push Release on Wellbeing Minister – February 22, 2021 pic.twitter.com/72DWWs90KG
— Indian Health care Affiliation (@IMAIndiaOrg) February 22, 2021
नियमानुसार कोणतेही औषध कोणताही डॉक्टर प्रमोट करू शकत नाही. परंतु केंद्रीय आरोग्यमंत्री हे एक डॉक्टर आहेत, त्यांच्याद्वारे औषध प्रमोट करणे आश्चर्य असल्याचेही निवेदनाद्वारे म्हटले आहे. बाबा रामदेव यांनी औषध लाँच केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या कोरोनिलशी निगडीत दस्तऐवज आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित केल्याचे म्हटले होते. तसेच काही वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमध्ये त्यांनी या औषधाला जागतिक आरोग्य संघटना आणि जगातील १५४ देशांची मान्यता मिळाल्याचेही म्हटले होते. परंतु जागतिक आरोग्य संघटनेद्वारे याचे खंडन करण्यात आल्यानंतर आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीवरून आयएमएने प्रश्न उपस्थित केले होते.
आचार्य बाळकृष्ण यांच्याकडून यानंतर स्पष्टीकरण देण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाला स्वीकारले किंवा नाकारलेही नाही. जगभरातील लोकांसाठी एक चांगले, आरोग्यदायी भविष्य घडविण्यासाठी डब्ल्यूएचओ कार्य करत असल्याचे ते म्हणाले होते.