बीजिंग – कोरोनाचा प्रसार नेमका कसा व कोठून सुरू झाला याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या चीन भेटीवर गेलेल्या पथकास देण्यास चीनने नकार दिल्यामुळे या भेटीतून ठोस काहीही हाती लागण्याची आशा मावळली आहे. या विषाणूचा प्रसार कसा झाला किंवा नंतर त्यात काय कसे घडत गेले याची प्रारंभिक स्वरूपातील माहिती चीनने दिली नाही, कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी जी गरजेची होती, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकात सहभागी एका संशोधकाने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाचे साथरोगतज्ञ डॉमनिक वेयर यांनी सांगितले, की चीनकडे कोरोनाच्या १७४ मूळ रुग्णांची माहिती मागितली होती. डिसेंबर २०१९ मध्ये ही साथ वुहानमध्ये सुरू झाली, त्यातील हे पहिल्या लाटेतील रुग्ण होते. चीनने त्यांची माहिती दिली नाही, केवळ सारांशवजा जुजबी माहिती दिली, त्यावरून काही निष्कर्ष काढणे कठीण आहे. कोरोनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी प्रारंभिक (कच्च्या) माहितीची गरज होती. ही माहिती निनावी असते. त्या रुग्णांना काय प्रश्न विचारण्यात आले, त्यांनी काय उत्तरे दिली, या माहितीला लाइन लिस्टिंग म्हणतात, तीच माहिती चीनने दिलेली नाही.
ही माहिती कुठल्याही साथीचा अभ्यास करताना आवश्यक असते. त्यांनी सांगितले, की हुनान बाजारपेठेशी १७४ रुग्णांचा संबंध आला होता व आता वुहानमधील हे सागरी पदार्थाचे केंद्र बंद केले आहे. हा विषाणू तेथूनच आल्याचा अंदाज आहे, पण आता त्यावर शिक्कामोर्तब करणे अवघड जाणार आहे. आम्ही त्यासाठी त्यांच्याकडे कच्ची माहिती विचारली, पण त्यांनी दिली नाही.
चीनने ही माहिती का दिली नाही हे समजू शकलेले नाही. तेथे गेल्यावर्षीही पथक गेले होते, त्यापेक्षा यंदा जास्त माहिती मिळाली असली, तरी कच्ची माहिती देण्यात आलेली नसल्याचे शेवटच्या अहवालात म्हटले आहे. जानेवारीत जागतिक आरोग्य संघटनेचे पथक वुहानला गेले. चीनने कच्ची माहिती देण्यास नकार दिल्याची पहिली बातमी वॉल स्ट्रीट जर्नलने शुक्रवारी दिली. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने काही प्रतिक्रिया दिलेली नाही.