पुढची किमान १० हजार वर्षे तरी येणाऱ्या पिढ्यांना आपली आठवण राहावी म्हणून अमेझॉनचे सीईओ, जगातील सर्वात धनवान व्यक्ती जेफ बेजोस टेक्सास येथे ५०० फुट उंचीचे घड्याळ उभारत आहेत. हे काम सुरु झाले असून त्यासाठी ४२ दशलक्ष डॉलर्स खर्च येणार आहे. हे अनोखे घड्याळ हवेवर चालेल आणि पुढची १० हजार वर्षे काम करेल असे समजते.
जेफ बेजोस यांच्या संपत्तीची चर्चा नेहमीच होत असते. जेफ बेजोस यांचे शौक त्यांच्या श्रीमंतीला शोभतील असेच आहेत. अमेझॉन या त्यांच्या ऑनलाईन शॉपिंग ब्रांडची उलाढाल अब्जावधी डॉलर्सची आहे. बेजोस येत्या २० जुलै रोजी त्यांच्या ब्ल्यू ओरिजिन कंपनीच्या न्यू शेफर्ड रॉकेट मधून अंतराळ प्रवास करणार आहेत. या कंपनीच्या माध्यमातून अंतराळ प्रवास करण्यासाठी १४३ देशातील ६ हजार लोकांनी बुकिंग केले असून यासाठी लिलाव करण्यात आला होता. या लिलावातून जमलेली रक्कम बेजोस यांच्या फौंडेशनला दान केली गेली आहे.
जमिनीच्या मालकीत बेजोस अमेरिकेत २८ व्या नंबरवर आहेत. यांच्या मालकीची ४ लाख २० हजार एकर जमीन आहे. सीएटल येथे त्यांचे दोन अलिशान बंगले असून बेवर्ली हिल येथे ६३ दशलक्ष डॉलर्स किमतीची हवेली आहे. लॉस एंजेलिस येथे बिल गेट्स यांच्या निवासस्थानाजवळ बेजोस यांनी १६५ दशलक्ष डॉलर्सची हवेली खरेदी केली आहे. वॉशिंग्टन येथे एक म्युझियम खरेदी करून त्याचे रुपांतर अलिशान घरात केले गेले आहे. त्यासाठी शेजारची बाकीची घरे हटविली गेल्याचे सांगितले जाते. माजी राष्ट्रपती ओबामा आणि ट्रम्प कन्या इव्हंका याच्या घराशेजारी ही हवेली आहे.
अंतराळाप्रमाणे बेजोस यांनी समुद्रात सुद्धा आपली उपस्थिती असावी म्हणून विशाल सुपरयाटची खरेदी केली आहे. ५० कोटी डॉलर्स किमतीचे हे याट अंतराळातून दिसले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. ४१७ फुट लांबीच्या या याट वर हेलिपॅड आहे. बेजोस जगातील सर्वाधिक वेगवान गल्फस्ट्रीम जी ६५० ईआर खासगी जेटचा वापर प्रवासासाठी करतात. त्याची किंमत साडेसहा कोटी डॉलर्स आहे.
विशेष म्हणजे जगातील सर्वात महाग घटस्फोटची नोंद बेजोस यांच्याच नावावर असून त्यांनी पत्नीला ३८ अब्ज डॉलर्स देऊन घटस्फोट सेटलमेंट केली होती. हवामान बदल धोका लक्षात घेऊन त्यांनी १० अब्ज डॉलर्स दान म्हणून दिले असून बेघरांना घरे मिळावी म्हणून २ अब्ज डॉलर्सचे दान दिले आहे.