कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीची झळाळी कायम असून, साखरेचे भाव विक्रमी ५०० डॉलर प्रति टनापर्यंत (३७,००० रुपये) गेले आहेत. दराची उसळी साखर उद्योगाला आश्वासक मार्ग दाखवत आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत गेल्या सप्ताहात मिळालेला हा सर्वाधिक दर असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. ही दर वाढ इथून पुढील काळात भारताच्या पथ्यावर पडणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
..ऑगस्टची झळाळी
ऑगस्टच्या पहिल्या दिवसापासूनच साखरेच्या (पांढरी साखर) दरात वाढती तेजी दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसांत अपवाद वगळता साखर दराची वाढ कायम दिसते. दररोज पाच ते सहा डॉलरने साखर दर वाढत आहेत. जुलै महिन्याच्या शेवटी साखरेचे दर ४६० डॉलर प्रति टनापर्यंत होते. यात वाढ होत ऑगस्ट मध्याला दराने ५०० चा पल्ला पार केला. १८ ऑगस्टला उच्चांकी ५०९ डॉलर इतका दर झाला. १२ ते १९ ऑगस्ट या कालावधीत ५०० किंवा ५०० डॉलरच्या आसपास दर मिळत असल्याने साखर उद्योगात ‘खुशीकी लहर’ दिसून येत असल्याचे दिसते.
हेही वाचा: अफगाणिस्तानमध्ये 300 तालिबान्यांचा खात्मा, अनेकजण बंदी
भारताला संधी
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी भारतीय साखर उद्योगाला प्रेरित करत आहे. गेल्या वर्षी ब्राझीलची साखर असतानादेखील भारताने उद्दिष्टा इतकी म्हणजे ६० लाख टनांपेक्षा जास्त साखर प्रत्यक्षात निर्यात केली. यंदा ब्राझील दुष्काळाच्या खाईत आहे. यामुळे तेथील साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. पुढील वर्षीही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. याचा अनुकूल परिणाम भारतीय बाजारपेठेतील साखरेच्या मागणीवर होऊ शकतो. काही देशात साखर उत्पादन वाढणार असले, तरी त्यांची साखर बाजारपेठेत येण्यास विलंब लागू शकतो.
हेही वाचा: ”सुनील केदारांना मंत्रिमंडळातून बरखास्त करा”
कारखान्यांनी एकदम साखर न विकता थोड्या थोड्या प्रमाणात जसे दर वाढतील तशी सावधगिरी बाळगून साखरेची विक्री केल्यास साखरेचे रखडलेले अर्थचक्र गतीने पुढे जाऊ शकते, असा विश्वास साखर उद्योगातील सूत्रांचा आहे. भारतात साखर उत्पादनाच्या बाबतीत गेल्या वर्षी सारखीच यंदा ही परिस्थिती आहे. यामुळे जरी जादा साखरनिर्मिती होणार असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर दराच्या बाबतीत होणाऱ्या घडामोडी साखर उद्योगासाठी चांगल्या ठरतील. आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढत असल्याने स्थानिक बाजारातील दर चांगले राहण्याची शक्यता आहे. स्थानिक साखरेची विक्री चांगल्या दरानेच होईल असा विश्वास साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला.
हेही वाचा: तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षाही धोकादायक! नीती आयोगाचा इशारा
आंतरराष्ट्रीय स्थानिक बाजारात साखरेचे दर चांगले वाढत असले, तरी कारखानदारांनी एकदम साखरेची विक्री एकदम न करता थोड्या थोड्या प्रमाणात करून चांगल्या दराचा लाभ करून घ्यावा. एकदम साखर विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास मागणी कमी होऊन दर ही कमी होण्याची शक्यता असते. गेल्या पंधरा दिवसांपासून आश्वासक दरवाढ झाली आहे. साखरेची विक्री नियोजन पद्धतीने केल्यास साखर कारखानदार ‘लाँग टर्म’ फायदा घेऊ शकतात. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता इथून पुढील काही महिने तरी साखर दराची तेजी टिकून राहील अशी शक्यता आहे.
– अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार
सरासरी आंतरराष्ट्रीय दर सहा महिन्यांतील (डॉलर/प्रति टन)
कच्च्या साखरेतही तेजीची शक्यता
भारतातील कच्च्या साखरेवर सौदी अरेबिया, दुबई, बांगलादेश, इंडोनेशिया आदी देशासह भारतातील कांडला, काकीनाडा या भागातील रिफायनरी अवलंबून आहेत. या रिफायनरींना यंदाच्या हंगामात कच्च्या साखरेची मोठी गरज लागणार आहे. पक्क्या साखरेबरोबर कच्च्या साखरेचे दर ही वाढत असल्याने कच्ची साखरनिर्मिती फायदेशीर ठरण्याचे संकेत आहेत. भविष्यात कच्ची साखर निर्मिती ही तितकीच फायदेशीर होऊ शकेल याकडे कारखानदारांनी गांभीर्याने लक्ष दिल्यास सध्या सुरू असणारा तेजीचा माहोल जास्त काळ सुरू राहू शकतो, त्याचा फायदा भारतीय साखरेला होऊ शकतो असे साखर उद्योगाच्या सूत्रांनी सांगितले.