अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील स्टार्टअप हंबल मोटर्सने जगातील पहिली सोलर पॉवरवर चालणारी इलेक्ट्रिक एसयुव्ही तयार केली आहे. पुरस्कारप्राप्त फॉर्म्युला वन रेसकार डिझायनरसह ऑटो इंडस्ट्रीतील दिग्गज लोकांनी ही कंपनी २०२० मध्ये स्थापन केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची मिळत असलेली पसंती आणि वाढती मागणी यामुळे अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक वाहन उद्योगाकडे अधिक लक्ष देऊ लागल्या आहेत. त्यातील काही कंपन्या भविष्यात फक्त इलेक्ट्रिक वाहने बनविण्यावर सुद्धा फोकस करत आहेत. मात्र इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग ही अजूनही समस्या आहे. त्यासाठी कार निर्माते इलेक्ट्रिक सोलर पॉवर कारच्या योजना आखत आहेत.
अश्या परिस्थितीत चार्जिंगची समस्या संपविणाऱ्या हंबल मोटर्सने कारच्या रुफवर सोलर पॅनल्स बसविले असून ते फोटोव्होल्टीक सेल सह आहेत. यामध्ये सोलर पॉवर साठवून ठेवता येते आणि चालता चालता कार स्वतःला रिचार्ज करवून घेऊ शकते. कार मध्ये वीजनिर्मिती करणारे साईडलाईट, पियर टू पियर चार्जिंग, रिजनरेटीव्ह ब्रेकिंग, फोल्ड आउट सोलर एरो विंग्सचा वापर केला गेला आहे. या सर्व तंत्रांमुळे कार पार्किंग करताना बॅटरी रिचार्ज करू शकते.
या एसयूव्ही ला चार दरवाजे असून ती ५ सिटर आहे. एका फुलचार्ज मध्ये ती ८०० किमी अंतर कापते आणि तिचा टॉप स्पीड आहे २६० किमी. ० ते १०० चा वेग ती २.५ सेकंदात घेते. रोज प्रवास करावा लागणाऱ्यांना ही एसयूव्ही अतिशय उत्तम वाहन आहे. या एसयूव्हीची किंमत अजून कळलेली नसली तरी एका रिपोर्ट नुसार ती १,०९,००० डॉलर्स म्हणजे ८० लाख रुपयात मिळेल. या एसयुव्हीचे बुकिंग सुरु झाले असून तिची डिलीव्हरी २०२४ पासून दिली जाणार आहे.